Saturday, April 6, 2019

ती गेली तेव्हा ....

आपण जन्माला आल्यापासून आपल्या आयुष्यात पहिल्यांदा घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींकडे आपल्या आजूबाजूच्या लोकांचे लक्ष असते. पहिले रडणे, पहिल्यांदा पालथे पडणे, पहिले पाऊल  टाकणे, पहिला बोललेला शब्द, तोंडात लुकलुकणारा पहिला दात..... पहिल्या रंगपंचमीला लावलेला केशराचा रंग, पहिल्या संक्रांतीचे हलव्याचे दागिने, पहिला वाढदिवस ... थोडे मोठे झाले कि पहिली शाळा, पहिला युनिफॉर्म, पहिले शिक्षक, पहिली परीक्षा, पहिले प्रगती पुस्तक... अजून थोडे मोठे झाले कि पहिली डिग्री, पहिली नोकरी, पहिले प्रमोशन .... अशी पहिले पणाची यादी चालूच राहते. ह्या तर झाल्या  आयुष्यात पहिल्यांदा घडणाऱ्या  गोष्टी पण आपण कितीही मोठे झालो तरी दर वर्षी खाल्लेला पहिला आंबा सुद्धा विशेष वाटतो आणि वेगळा आनंद देऊन जातो. या पहिले पणात खरंच खूप मजा आहे, वेगळेपण आहे , आनंद आहे आणि नावीन्य आहे. 

आपल्या समाजात पूर्वी गाडी, बंगला आणि विमानप्रवास ही  समृद्धीची लक्षणे मानली जायची. कारण मर्यादित गरजा असलेल्या त्या काळाच्या लोकांना आवर्जून कर्ज काढून या गोष्टी कराव्यात हे मान्यच नव्हते. पण काळ बदलला. नोकरीच्या निमित्ताने अनेकांना विमानप्रवास गरजेचा झाला आणि हळू हळू सवयीचा झाला. मर्यादित जमीन आणि त्यामुळे वाढत्या किंमती यामुळे बंगल्याची हौस लोक फ्लॅट वरच भागवायला लागले. घर ते ऑफिस यांची वाढणारी अंतरे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची बिकट अवस्था बघता गाडी सुद्धा हळू हळू घरोघरी दिसायला लागली. आधी एक दुचाकी असायची मग घरटी दोन दुचाक्या आल्या आणि नंतर घरोघरी चारचाकी दिसायला लागली. आता बऱ्याच घरात त्याही दोन असतात. पण तरीसुद्धा आजही स्वतःचे पहिले घर, पहिला विमान प्रवास आणि पहिली गाडी यातील आनंद काही कमी झालेला नाही. 

१६-ऑगस्ट-२००४ रोजी आमच्या कुटुंबात आमची पहिली फोर-व्हिलर सँट्रो चे आगमन झाले. खूप संशोधन वगैरे करायची गरज पडली नाही कारण ती त्यावेळी बऱ्यापैकी विकल्या जाणाऱ्या  गाड्यांपैकी एक होती. आमच्या एका  मित्राने  ती नुकतीच घेतली होती त्यामुळे प्रत्यक्ष प्रवास करून चांगली वाटली होती. जास्त विचार मंथनाचा घोळ न घालता घेतलेले बरेच निर्णय जसे योग्य ठरतात तसाच हा निर्णयसुद्धा अचूक ठरला. बुक केल्यानंतर ७-८ दिवसात तिचे आमच्या घरी आगमन झाले.  तेव्हापासून या गाडीने आम्हा सर्वांना फक्त आनंद, आनंद आणि आनंदच दिला.
तिने आम्हाला जसे हायवे वरून सुसाट फिरवले तसे ग्रामीण भागातील रस्त्यांवरसुद्धा न कुरकुरता सुखरूप पोहोचवले. आजी आजोबाना घेऊन देवदर्शनाला ती जितक्या श्रद्धेने गेली तितक्याच खट्याळपणे ती ओमला घेऊन बागेत गेली. साखरपुड्यापासून ते लग्न होईपर्यंत अमृताच्या आणि माझ्या एकमेकाला समजून घेण्याच्या प्रवासात ती एक मैत्रीण म्हणून कायम आमच्या बरोबर होती. ती फक्त आमच्याच कुटुंबापुरती राहिली नाही तर  तिनेही बरेच ऋणानुबंध जोडले. रात्री अपरात्रीच्या वेळी अवघडलेल्या बाळंतिणीला सुखरूप दवाखान्यात पोहोचवून तिने अनेक आशीर्वाद मिळवले.  ती मुले आता हायस्कूलला गेली  तरी त्यांच्या आया जेव्हा त्यांना कौतुकाने सांगतात कि "ह्याच गाडीमधून तू पहिला प्रवास केलास  बरं का " तेव्हा हिचे ऊर जणू अभिमानाने भरून येते. अनेक लग्न आणि मुंजींमध्ये अवखळ तरुणी सारखी फुलांनी नटून थटून वरात घेऊन ती वाजत गाजत घरी आली.  
घरात कोणी आजारी असेल तेव्हा त्यांना तर तिने काळजीपूर्वक, सुखरूप आणि वेळेवर  दवाखान्यात नेलेच पण जेव्हा कोणा स्नेह्यांना काही कारणाने दवाखान्यात न्यावे लागले तेव्हा सुद्धा ती थोडी हळवी झाली. ओमच्या जन्मानंतर त्याला पहिल्यांदा घरी घेऊन येताना तिलाही आमच्या एवढाच किंबहुना थोडासा अधिकच आनंद झाला असणार कारण त्याच्यासाठी केलेल्या अनेक नवसांसाठी, देव दर्शनांसाठी, औषधोपचारांसाठी आम्हाला घेऊन जाताना  पायपीट (किंवा चाकपीट) खऱ्या अर्थाने तिनेच केली होती. तिला  सर्व्हिसिंग साठी गॅरेज ला पाठवायला बऱ्याचदा मला उशीर व्हायचा तरी तिने कधी तक्रार केली नाही. रूढ मोजपट्टीनुसार ती कदाचित खूप फिरली नसेल पण योग्य वेळी यौग्य ठिकाणी सुरक्षित पोहोचवण्यासाठी ती कायम तत्पर होती आणि तिने ते काम नेहेमीच व्यवस्थित केले. खरे पाहायला गेले तर एक निर्जीव यंत्र पण तिने सगळ्यांना खूप जीव लावला. तिच्या बरोबर फिरायची जणू सवयच लागली.  


ती जेव्हा दहा वर्षाची झाली तेव्हा पासून लोक म्हणायला लागले कि आता हि विकून टाका, दुसरी घ्या. "आमचा गाडीचा वापर कमी आहे, काय करायची आत्ता नवीन घेऊन?"  असे मी म्हणायचो पण खरे तर हिला दुसऱ्या कोणाला तरी  देऊन टाकायची कल्पनासुद्धा  सहन होत नव्हती. "चाललो तिच्यासवे , तिच्यात जीव गुंतला" अशी आमची अवस्था झाली होती.  "बघू पुढच्या वर्षी" असे म्हणत म्हणत मी काही वर्षे काढली. पण आता तिला आमच्या कुटुंबात येऊन १४ वर्षाहून अधिक काळ होऊन गेला.  आता तिची हवा, ऑइल,  सर्व्हिसिंग अशा बाबतीत अधिक काळजी घेतली पाहिजे, तिला रोज एखादी चक्कर मारुन आणली पाहिजे, बॅटरी चार्जिंग, एसी वर्किंग रेग्युलरली तपासले पाहिजे...  या गोष्टी कदाचित दुसरा कोणीतरी माझ्यापेक्षा अधिक चांगल्या रीतीने  करू शकेल असे वाटले म्हणून तिला निरोप देण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

ती कुठे जाईल, कोणाकडे राहील याची आत्ता तरी काही कल्पना नाही पण आजपर्यंत तिने जी उत्तम सेवा दिली आहे ती पाहता तिला चांगलेच घर मिळेल. ती तिथेही सगळ्यांना आनन्द देऊन स्वतःचे जिव्हाळ्याचे स्थान निर्माण करेल यात शंकाच  नाही. 

आज १४ वर्षे ७ महिने आणि १० दिवसांनी आमच्या घरातील मुक्काम कायमचा हलवून जेव्हा ती निघाली तेव्हा आम्हा सगळ्यांचेच मन गहिवरून आले होते आणि  "सायोनारा सँट्रो" असे म्हणताना संदीप खरे यांच्या या ओळी पुन्हा पुन्हा आठवत होत्या ---

हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे, ते दूर दूर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना
डोळ्यांतील अडवून पाणी, हुंदका रोखुनी कंठी
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते
हे भलते अवघड असते.....   

2 comments: