Thursday, July 11, 2019

अमृत महोत्सव - निरपेक्ष प्रेमाचा, अखंड कष्टाचा आणि कर्तव्य पूर्तीचा ...

जे लोक नोकरी करतात, व्यवसाय करतात किंवा सामाजिक क्षेत्रात काम करतात त्यांचे किमान समाजात कुठे तरी कौतुक होते. पण आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी घरात राहून विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या गृहिणीचे काय ? कदाचित प्रत्येक स्त्री ही मुलगी, पत्नी, सून, माता,  सासू  आणि  आजी च्या भूमिकेत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असतेच पण म्हणून त्या सगळ्याच गृहीत धरून त्याचे कधीच समाजाकडून कौतुक होत नाही.  माझी आई आज वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहे. तिचे अभिनंदन करण्याचा, गुणगौरव करण्याचा आणि कुटुंबियांसाठी घेतलेल्या कष्टांचा ऋणनिर्देश करण्याचा योग  आजपर्यंत कधीच आला नाही. मला माहित आहे की असे कौतुक तिला किंवा तिच्यासारख्या विचाराच्या कोणाही मातेला आवडणार नाही. पण हे करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आज तिच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाची संधी साधून माझ्या आईसाठी हे दोन शब्द लिहीत आहे. यात तुम्हाला कुठे तुमची आई/ बहीण/ आजी  जाणवली तर माझा हा प्रयत्न सार्थकी लागला आणि माझा नमस्कार त्या असंख्य अनामिक  माता भगिनींपर्यंत पोहोचला असे  मी  समजेन.  
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील धामणी या छोट्याशा पण टुमदार गावात एका प्रगतिशील (सधन नव्हे) शेतकऱ्याच्या घरात तिचा जन्म झाला. सात बहिणी आणि एक भाऊ अशा मोठ्या कुटुंबात आईच्या मायेत आणि वडिलांच्या शिस्तीत जडणघडण झाली. पुढे अंगण-ओसरी, परसदारी बाग आणि विहीर, गोठ्यात गाई-म्हशी,  शेणाने सारवलेली जमीन असलेले ६ खणी दुमजली घर, स्वयंपाकघरात चूल, पाणी तापवायला बंब, धान्य दळायला जाते, उजेडासाठी चिमण्या आणि कंदील, बटाटा-गाजर-हरभरा-संत्री -मोसंबी अशी पिके निघणारे शेत आणि रसाळ मधुर फळे  देणारी आंब्याची झाडे ... अशा सगळ्या वातावरणात घरातील आणि शेतातील सगळी कामे करत करत अस्सल मराठी मातीचे  संस्कार होत तिचे बालपण सरले. पडेल ते कष्ट करण्याची तयारी आणि वैयक्तिक प्रगती पेक्षा कौटुंबिक जबाबदारीला महत्व देण्याची सवय या वयापासूनच लागली.  माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले आणि मग पुण्यात वडील बंधू आणि वहिनींच्या बरोबर राहून नोकरीला सुरुवात केली. पुण्याच्या शहरी जीवनाशी जुळवून घेताना कसबा  पेठेत राहून बस आणि लोकल चा प्रवास करून  पिंपरी-चिंचवड भागात नोकरी करताना एक वेगळेच अनुभव विश्व तयार झाले.

त्यादरम्यान योग जुळून आले आणि विवाह ठरला. माहेरी ९ भावंडांमध्ये आठवा  क्रमांक असल्यामुळे धाकटेपणाचा आनंद घेतल्यावर  विवाहानंतर मात्र एकदम थोरल्या सुनेची जबाबदारी आली. त्यामुळे नोकरी सोडून पुन्हा  कौटुंबिक जबाबदारीला महत्व दिले. सासरीसुद्धा मोठे आणि एकत्र कुटुंब होते. सासूबाई, सासरे, चुलत सासरे, दोन दीर , दोन नणंदा..  पण  ती जबाबदारी सुद्द्धा मोठ्या कौशल्याने सांभाळली. सासूबाई असताना एका दिराचे आणि सासूबाईंच्या निधनानंतर दुसऱ्या दिराचे लग्न केले.   

अण्णांच्या नोकरी निमित्ताने पुण्याबाहेर लातूर, जुन्नर अशा गावात  राहण्याची संधी मिळाली. जुन्नर मध्ये असताना १-२ वर्षाच्या मला कडेवर घेऊन ही माउली  शिवनेरी चढून गेली. तर लातूर मध्ये पाणी समस्या अतिशय गंभीर असताना रस्त्यावर जाऊन २-३ फूट खड्ड्यात असलेल्या नळातून दिवसभर पुरेल इतके पाणी भरून आणण्यासारखी आव्हाने पार पडत दिवस काढले. १९८१ च्या सुमारास पुण्यात परत आल्यावर २ खोल्यांच्या  छोट्याशा का होईना पण स्वतःच्या घरात राहायला जाण्याचा योग आला. दिवस आनंदात जात होते पण घर लहान असल्याने त्यावेळी सासरे, चुलत सासरे आणि नणंद यांना तिथे राहायला आणता आले नव्हते. त्यामुळे धाडस करून पुढील काळात अजून थोडे मोठे घर घेतले आणि सगळ्यांना एकत्र राहायला आणले. तेव्हापासून जी जबाबदारी घेतली ती अखेरपर्यंत.  सासरे (९४ वर्षे), चुलत सासरे (९२ वर्षे) आणि नणंद (७३ वर्षे) यांची शेवट पर्यंत काळजी घेतली. नणंदेला तर कायम धाकटी बहीणच मानले आणि कधीही स्वतःसाठी खरेदी करताना कायम तिच्यासाठीही केली.

हे सगळे चालू असताना अचानक अण्णांना दृष्टी गमवावी लागली. त्यांच्या उपचारासाठी सर्व प्रयत्न करूनही यश आले नाही हा मानसिक धक्का. अचानक घरातील उत्पन्न बंद झाले आणि ६ माणसांचे कुटुंब चालवायचे हा व्यावहारिक पेच. पण ती  मोठ्या धीराने उभी राहिली. स्वतः पापड करून विकणे, मुलांच्या शिकवण्या घेणे असं जे काही तिला शक्य होते ते सगळे करून तिने घर तर चालवलेच पण माझे शिक्षणही चालू ठेवले. मला चांगल्यात चांगले शिक्षण मिळावे   म्हणून तिने कायम प्रयत्न केले. ग्रॅज्युएशन नंतर मी नोकरी शोधायला सुरुवात केली. तेव्हा तिला काही जाणकारांनी सांगितले कि त्याला मास्टर डिग्री करुद्या अधिक प्रगती होईल. तिने त्या काळात सुद्धा पुन्हा धाडस केले, अजून दोन वर्षे अडचण सहन करायची ठरवली आणि मला मास्टर्सला ऍडमिशन घेतली.         
ही सगळी आव्हाने घरात असताना भाच्या आणि भाचेसूनांची कोडकौतुक करण्यात ती कधी मागे राहिली नाही. आपल्या बहिणींकडे डोहाळेजेवणाची पद्धत नाही हे माहित असल्या मुले सगळ्या भाच्या आणि भाचेसूनांची डोहाळेजेवण तिने उत्साहाने केली. इतकेच नाही तर नातवंडांचे हि शक्य तेवढे कौतुक केले. घरातील कुळधर्म कुलाचार सुद्धा व्यवस्थित सांभाळले. आजही ती देवीचे, खंडोबाचे, नरसिंहाचे नवरात्र, गणपती आणि उभ्याच्या गौरी हे सगळे  कुलाचार उत्तमरित्या पार पाडते. घरातील सगळ्यांच्या खाण्यापिण्याकडे आजही तिचे बारीक लक्ष असते आणि कोणी आजारी पडू नये याची ती काळजी घेत असते. काही दिवसांपूर्वी अण्णांवर महाराष्ट्र टाइम्स मध्ये लेख आला तेव्हा फोन करणाऱ्या जवळपास सगळ्या लोकांनी अण्णांचे अभिनंदन करताना हे ही सांगितले कि " वहिनींनी अण्णांची आणि कुटुंबाची जी काळजी घेतली ती शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडची आहे".

माझे लग्न झाल्यावर सून म्हणून अमृता घरात आल्यानंतर सासूबाई या नवीन भूमिकेत तिने प्रवेश केला. सुनेचं शक्य तेवढे सगळे कौतुक तिने केले पण झालेल्या चुकासुद्धा समजावून सांगून तिला सुधारणा करायला मदत केली. सुरुवातीला अमृताला परदेशी कंपनीतली शिफ्ट टाईमिंग ची नोकरी करताना आणि आता शिक्षिकेच्या नव्या नोकरीला सुरुवात करताना तिनेच प्रोत्साहन दिले. आणि नुसते प्रोत्साहन देऊन गोष्टी होत नाहीत. आज ७५ वयामध्ये सुद्धा ती घरातील सगळी कामे करायला सक्षम आहे. ती अजूनही बऱ्याच कामांची जबाबदारी घेते म्हणूनच  अमृताला नोकरी करणे आणि अभ्यास करून नवीन परीक्षा देणे हे शक्य होते. आज या वयात ५ वर्षाच्या नातवाच्या मागे पळणे हे सोपे काम नाही पण त्याची माया तिला ती ऊर्जा पण मिळवून देते.

चर्चेपेक्षा कृती आणि निमित्तापेक्षा गरज याला तिने जास्त महत्व दिले. कोणी वारले तर दोन दिवसांनी जाऊन सांत्वनाच्या भेटीपेक्षा लगेच जाऊन मदत करणे आणि संध्याकाळची पिठले भाकरी देणे तिला जास्त महत्वाचे वाटले. कोणाच्या लग्नात नटूनथटून मिरवण्यापेक्षा मुहूर्तापासून गोंधळापर्यंत त्यांना शक्य ती मदत करणे तिने आवडीने केले. त्यामुळे ती अल्बम मधल्या फोटोत कमी आणि लोकांच्या आठवणीत जास्त आहे. खरे तर खूप गप्पा मारण्याचा तिचा स्वभाव नाही.  त्यामुळे ती रस्त्यात, सोसायटी मध्ये घोळक्यात गप्पा मारत बसलेली कधी दिसणार नाही.  थोडा वेळ मोकळा असेल तर  तिला  घरातील कामे डोळ्यापुढं दिसतात आणि  पटकन दोन कामे संपवून टाकण्याकडे तिचा कल  असतो. तिला अजूनही स्वयंपाकाला बाई ठेवण्याची कल्पना मान्य नाही आणि आजही पूर्ण स्वयंपाक करण्याची तिची क्षमता आहे. ती कधीच कुठल्या बाबतीत इतरांवर फारशी अवलंबून नसते. आणि त्यामुळेच ती जे आहे ते समोरच्याशी स्पष्ट बोलून विषय मार्गी लावते. " कोणाच्या मागे टाकून बोलण्यापेक्षा तोंडावर बोलून टाकावे "असा तिचा परखड स्वभाव आहे.  खोटे खोटे गोड़ बोलणे तिला जमत नाही.



आमच्यावर तिचा जीव आहेच पण ओम समोर आल्यावर मात्र तिचे वेगळेच रूप बघायला मिळते. त्याचे किती लाड करू आणि किती नको असे तिला होऊन जाते. तिचा बराचसा दिवस त्याच्या दिनक्रमावर आधारित असतो. खूप त्रास दिला तर ती त्याला रागावते पण दोघांनाही माहित असते कि हे तात्पुरते आहे आणि ५ मिनिटात परत गट्टी होणार आहे.

तिने स्वतः कायम दीक्षित आहार पद्धतीच वापरली. तिने कधीच सकाळी नाश्ता केलेला आणि दुपारी चहाबरोबर काही खाल्लेले कोणी पाहिलेले नाही. नाश्त्याला जे काही केले असेल त्याची ती जेवतानाच चव बघते. पण असे असले तरी घरातील सगळ्यांना आणि बाहेरच्यांना मात्र ती दिवेकर पद्धतीने दर दोन तासांनी नवीन काहीतरी खायला घालू शकते. तिच्या हाताला वेगळी छान चव आहे असे बरेच जण म्हणतात. तिच्या हातचे लाडू आणि लोणची यांची  परगावाहून, परराज्यातून आणि परदेशातून सुद्धा लोक आठवण काढतात.  काही  खवय्ये तर मागवून सुद्द्धा घेतात आणि त्यांच्यासाठी ती आवर्जून करून पाठवते. आजपर्यंत अनेकजणी  तिच्याकडे लाडू शिकून गेल्या आहेत.  स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे मिळवण्यापेक्षा तिने कायम पोटभर आणि स्वादिष्ट  खायला घालून आशीर्वादच मिळवले. तिला अनेक आजारांवर घरगुती औषधे माहित आहेत. ही देणगी तिला तिच्या आईकडून मिळाली आहे. त्याचाही अनेकजणांना तिने लाभ करून दिला आहे.

योगायोगाने उद्या आषाढी एकादशी आहे. मला सांगावेसे वाटते कि  विठू माउली जसा वारकऱ्यांचा आधार आहे  तसा तीच आमच्या घराचा आधार आहे. चार दिवसांनी गुरु पौर्णिमा आहे. माता आपली पहिली गुरु असते.  "कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" या वृत्तीने जीवन जगणारा हा गुरु मी घरातच पाहिलाय. भारतीय क्रिकेट संघात मागची १५ वर्षे महेंद्र सिंग धोनी नावाचे वादळ घोंघावतंय आणि आता निवृत्तीचा काळ आला तरी अजूनही जबाबदाऱ्यांचे ओझे तो वाहत आहे. तिकडे तो MSD आणि आमच्या घरात सौ. मीना सदाशिव दशपुत्रे नावाचा एक MSD. सातत्याने आव्हानांशी मुकाबला करणे, नव्यांना प्रोत्साहन देणे, वेळ पडेल तिथे  वाईटपणा घेऊन जुन्याला नारळ देणे, कठीण परिस्थितीत पुढे जाऊन लढणे आणि आनंदाच्या वेळी इतरांना पुढे करून स्वतः मागे राहणे... ७५ वर्षे हेच चालू आहे. ५० व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन नाही, षष्ट्यब्दी पूर्तीचा  सोहळा नाही. ७० च्या टप्प्याचे कौतुक नाही. तिला स्वतःचे कौतुक करून घ्यायला कधीच आवडले नाही किंवा स्वतःवर फार खर्च झालेला सुद्धा आवडत नाही. तिच्या मते  वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, कुटुंबियांचे प्रेम आणि नातवाचा गोड़ पापा यातून मिळणारे समाधान आणि आनंद याची तुलना कशाशीच  होऊ शकत नाही. त्यामुळे आजसुद्धा या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कुठलाही धार्मिक विधी करायला, कुठल्याही भेटी स्वीकारण्याला, मोठा गौरव सोहळा करण्याला आणि  स्नेहमीलन आयोजित करण्याला तिने  नम्र नकार दिला आहे. कुलदैवतांवर व सद्गुरूंवर अढळ  श्रद्धा आणि चांगल्या कामावर अखंड विश्वास असल्यामुळे यानिमित्ताने फूल ना फुलाची पाकळी स्वरूपात शक्य त्या रकमेचे दान करून  उत्तम काम करणाऱ्या पण प्रकाशझोत पासून दूर असलेल्या सामाजिक संस्थांच्या आणि भक्तीचा बाजार न मांडणाऱ्या देवस्थानांच्या कार्यात खारीचा वाटा  उचलण्याचे  तिने ठरवले आहे.  या सगळ्या संस्थांना त्याचा नक्कीच फायदा होईल आणि त्यांचे काम अजून वृद्धिंगत होईल याची खात्री वाटते.


प्रिय ती. सौ. आई,

आज आयुष्याच्या या अमृत महोत्सवी टप्प्यावर आम्ही तुझ्या बरोबर आहोत आणि या पुढेही राहणार आहोत. आम्हाला कल्पना नाही कि  तुझ्या आयुष्यात आमच्यामुळे आजपर्यंत कितपत आनंद आला आहे पण या पुढे तो येईल याचा नक्की  प्रयत्न करू.

या निमित्ताने तुला एक विनंती करावीशी वाटते -
इतरांसाठी खूप वेळ घालवलास आता थोडा वेळ स्वतःला देऊन बघ.
आज पर्यंत खूप कष्ट केलेस. आता अधून मधून थोडी विश्रांती घेऊन बघ.
इतरांच्या तब्येतीची खूप काळजी घेतेस, थोडे स्वतःच्या तब्येतीकडेही लक्ष दे.
इतके छान छान पदार्थ करतेस, कधीतरी एक प्लेट गरम गरम खाऊन बघ.
बघ तरी कसं वाटतं ते.   

तुझे या पुढील आयुष्य सुखाचे, समाधानाचे, आरोग्यपूर्ण आणि  विनाकटकटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

आनंदी दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!! 



Saturday, April 6, 2019

ती गेली तेव्हा ....

आपण जन्माला आल्यापासून आपल्या आयुष्यात पहिल्यांदा घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींकडे आपल्या आजूबाजूच्या लोकांचे लक्ष असते. पहिले रडणे, पहिल्यांदा पालथे पडणे, पहिले पाऊल  टाकणे, पहिला बोललेला शब्द, तोंडात लुकलुकणारा पहिला दात..... पहिल्या रंगपंचमीला लावलेला केशराचा रंग, पहिल्या संक्रांतीचे हलव्याचे दागिने, पहिला वाढदिवस ... थोडे मोठे झाले कि पहिली शाळा, पहिला युनिफॉर्म, पहिले शिक्षक, पहिली परीक्षा, पहिले प्रगती पुस्तक... अजून थोडे मोठे झाले कि पहिली डिग्री, पहिली नोकरी, पहिले प्रमोशन .... अशी पहिले पणाची यादी चालूच राहते. ह्या तर झाल्या  आयुष्यात पहिल्यांदा घडणाऱ्या  गोष्टी पण आपण कितीही मोठे झालो तरी दर वर्षी खाल्लेला पहिला आंबा सुद्धा विशेष वाटतो आणि वेगळा आनंद देऊन जातो. या पहिले पणात खरंच खूप मजा आहे, वेगळेपण आहे , आनंद आहे आणि नावीन्य आहे. 

आपल्या समाजात पूर्वी गाडी, बंगला आणि विमानप्रवास ही  समृद्धीची लक्षणे मानली जायची. कारण मर्यादित गरजा असलेल्या त्या काळाच्या लोकांना आवर्जून कर्ज काढून या गोष्टी कराव्यात हे मान्यच नव्हते. पण काळ बदलला. नोकरीच्या निमित्ताने अनेकांना विमानप्रवास गरजेचा झाला आणि हळू हळू सवयीचा झाला. मर्यादित जमीन आणि त्यामुळे वाढत्या किंमती यामुळे बंगल्याची हौस लोक फ्लॅट वरच भागवायला लागले. घर ते ऑफिस यांची वाढणारी अंतरे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची बिकट अवस्था बघता गाडी सुद्धा हळू हळू घरोघरी दिसायला लागली. आधी एक दुचाकी असायची मग घरटी दोन दुचाक्या आल्या आणि नंतर घरोघरी चारचाकी दिसायला लागली. आता बऱ्याच घरात त्याही दोन असतात. पण तरीसुद्धा आजही स्वतःचे पहिले घर, पहिला विमान प्रवास आणि पहिली गाडी यातील आनंद काही कमी झालेला नाही. 

१६-ऑगस्ट-२००४ रोजी आमच्या कुटुंबात आमची पहिली फोर-व्हिलर सँट्रो चे आगमन झाले. खूप संशोधन वगैरे करायची गरज पडली नाही कारण ती त्यावेळी बऱ्यापैकी विकल्या जाणाऱ्या  गाड्यांपैकी एक होती. आमच्या एका  मित्राने  ती नुकतीच घेतली होती त्यामुळे प्रत्यक्ष प्रवास करून चांगली वाटली होती. जास्त विचार मंथनाचा घोळ न घालता घेतलेले बरेच निर्णय जसे योग्य ठरतात तसाच हा निर्णयसुद्धा अचूक ठरला. बुक केल्यानंतर ७-८ दिवसात तिचे आमच्या घरी आगमन झाले.  तेव्हापासून या गाडीने आम्हा सर्वांना फक्त आनंद, आनंद आणि आनंदच दिला.
तिने आम्हाला जसे हायवे वरून सुसाट फिरवले तसे ग्रामीण भागातील रस्त्यांवरसुद्धा न कुरकुरता सुखरूप पोहोचवले. आजी आजोबाना घेऊन देवदर्शनाला ती जितक्या श्रद्धेने गेली तितक्याच खट्याळपणे ती ओमला घेऊन बागेत गेली. साखरपुड्यापासून ते लग्न होईपर्यंत अमृताच्या आणि माझ्या एकमेकाला समजून घेण्याच्या प्रवासात ती एक मैत्रीण म्हणून कायम आमच्या बरोबर होती. ती फक्त आमच्याच कुटुंबापुरती राहिली नाही तर  तिनेही बरेच ऋणानुबंध जोडले. रात्री अपरात्रीच्या वेळी अवघडलेल्या बाळंतिणीला सुखरूप दवाखान्यात पोहोचवून तिने अनेक आशीर्वाद मिळवले.  ती मुले आता हायस्कूलला गेली  तरी त्यांच्या आया जेव्हा त्यांना कौतुकाने सांगतात कि "ह्याच गाडीमधून तू पहिला प्रवास केलास  बरं का " तेव्हा हिचे ऊर जणू अभिमानाने भरून येते. अनेक लग्न आणि मुंजींमध्ये अवखळ तरुणी सारखी फुलांनी नटून थटून वरात घेऊन ती वाजत गाजत घरी आली.  
घरात कोणी आजारी असेल तेव्हा त्यांना तर तिने काळजीपूर्वक, सुखरूप आणि वेळेवर  दवाखान्यात नेलेच पण जेव्हा कोणा स्नेह्यांना काही कारणाने दवाखान्यात न्यावे लागले तेव्हा सुद्धा ती थोडी हळवी झाली. ओमच्या जन्मानंतर त्याला पहिल्यांदा घरी घेऊन येताना तिलाही आमच्या एवढाच किंबहुना थोडासा अधिकच आनंद झाला असणार कारण त्याच्यासाठी केलेल्या अनेक नवसांसाठी, देव दर्शनांसाठी, औषधोपचारांसाठी आम्हाला घेऊन जाताना  पायपीट (किंवा चाकपीट) खऱ्या अर्थाने तिनेच केली होती. तिला  सर्व्हिसिंग साठी गॅरेज ला पाठवायला बऱ्याचदा मला उशीर व्हायचा तरी तिने कधी तक्रार केली नाही. रूढ मोजपट्टीनुसार ती कदाचित खूप फिरली नसेल पण योग्य वेळी यौग्य ठिकाणी सुरक्षित पोहोचवण्यासाठी ती कायम तत्पर होती आणि तिने ते काम नेहेमीच व्यवस्थित केले. खरे पाहायला गेले तर एक निर्जीव यंत्र पण तिने सगळ्यांना खूप जीव लावला. तिच्या बरोबर फिरायची जणू सवयच लागली.  


ती जेव्हा दहा वर्षाची झाली तेव्हा पासून लोक म्हणायला लागले कि आता हि विकून टाका, दुसरी घ्या. "आमचा गाडीचा वापर कमी आहे, काय करायची आत्ता नवीन घेऊन?"  असे मी म्हणायचो पण खरे तर हिला दुसऱ्या कोणाला तरी  देऊन टाकायची कल्पनासुद्धा  सहन होत नव्हती. "चाललो तिच्यासवे , तिच्यात जीव गुंतला" अशी आमची अवस्था झाली होती.  "बघू पुढच्या वर्षी" असे म्हणत म्हणत मी काही वर्षे काढली. पण आता तिला आमच्या कुटुंबात येऊन १४ वर्षाहून अधिक काळ होऊन गेला.  आता तिची हवा, ऑइल,  सर्व्हिसिंग अशा बाबतीत अधिक काळजी घेतली पाहिजे, तिला रोज एखादी चक्कर मारुन आणली पाहिजे, बॅटरी चार्जिंग, एसी वर्किंग रेग्युलरली तपासले पाहिजे...  या गोष्टी कदाचित दुसरा कोणीतरी माझ्यापेक्षा अधिक चांगल्या रीतीने  करू शकेल असे वाटले म्हणून तिला निरोप देण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

ती कुठे जाईल, कोणाकडे राहील याची आत्ता तरी काही कल्पना नाही पण आजपर्यंत तिने जी उत्तम सेवा दिली आहे ती पाहता तिला चांगलेच घर मिळेल. ती तिथेही सगळ्यांना आनन्द देऊन स्वतःचे जिव्हाळ्याचे स्थान निर्माण करेल यात शंकाच  नाही. 

आज १४ वर्षे ७ महिने आणि १० दिवसांनी आमच्या घरातील मुक्काम कायमचा हलवून जेव्हा ती निघाली तेव्हा आम्हा सगळ्यांचेच मन गहिवरून आले होते आणि  "सायोनारा सँट्रो" असे म्हणताना संदीप खरे यांच्या या ओळी पुन्हा पुन्हा आठवत होत्या ---

हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे, ते दूर दूर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना
डोळ्यांतील अडवून पाणी, हुंदका रोखुनी कंठी
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते
हे भलते अवघड असते.....